गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

7. Take-off

"Ladies and gentlemen, this is your captain speaking. We like to welcome you on-board..." माधवी ला पुढची announcement ऐकायचं भान नव्हतं.  विंडो सीट वरून पंखाच्या पलीकडे पहात राहिली ती . समोर प्रचंड मोठा runway पसरलेला. बाहेर संध्याकाळचा सुंदर प्रकाश. खिडकीतून डोळे रोखूनसुद्धा बघता येणारा सुर्य. माधवी त्याच्याचकडे बघत होती. गेल्या २ महिन्यांपासून आत्ता कुठे तिला शांत वेळ मिळाला होता. आजूबाजूला लोकांची गडबड चालू असताना देखील तिचं मन मात्र स्थिर .. कुठल्यातरी मोठ्या निश्चयाची पूर्तता झाल्यासारखं.. ही वादळानंतरची शांतता..

...................................................................................................................................................................

डाव्या मनगटावर ओरखडा उठला होता. किती तास माधवी आतमध्ये होती कुणास ठाऊक! सात तर नक्कीच झाले असणार. दार  वाजवू नये म्हणून तिचे  हात बांधले होते. आणि भाजीमध्ये मीठ नसल्याची अद्दल म्हणून डोक्यावर मिठाची बरणी ओतली होती. चिडला कि अक्षरशः राक्षस बनतो पंकज.शेजारच्या लोकांना कल्पना होती थोडीफार पण बाकी कुणाला कधी खरं देखील वाटलं नसतं. आणि आता थोडी-थोडकी नाही चांगली दहा वर्ष उलटली की . दहा वर्ष.. माधवीला एकदम रडूच आलं . कसं सहन केलं आपण इतकं .कुणाला सांगून तरी काय केलं असतं म्हणा. इतक्या श्रीमंत घरातलं स्थळ.. आईला बोलून तरी काय झालं शेवटी.
"मुल होत नाही तुला तर थोडी चिडचिड होणं बरोबरच आहे त्याची .. adjust कर माधवी. लहान आहेस का आता "
adjust ? कुणी घरात नसताना सट सट पट्ट्यांनी मारणं , पैसे मागितले म्हणून हात उचलणं.. दिलेल्या रुपया रुपयाचा हिशेब विचारणं, मैत्रिणीशी फोन वर बोलली म्हणून कोंडून ठेवणं. काय आणि किती..

...................................................................................................................................................................

"बापरे..  काय सांगता? कोण? पंकज जोशी? तो D विंग मधला? कसं काय? माणूस फार वयस्कर नव्हता तसा. काय बाबा एकेक.. किती तरुण वयात आजकाल heart attack यायला लागलेत. आमचे डॉक्टर सांगत होते, २५-२६ वर्षाची मुलं सुद्धा हार्ट चं दुखणं घेऊन दवाखान्यात येतात म्हणे . बायको आहे ना मागे आता ? च्च..  कसं होणार तिचं आता. मुलबाळ नव्हतंच.. पैसा वगैरे असेलही पण एकुलता एक आधार गेला. हादरलीच असेल हो पूर्णपणे. काय नाव म्हणालात? माधवी? "

...................................................................................................................................................................

"माधवी, अग लोक किती नावं ठेवतील.  महिना होतोय त्याला जाऊन आत्ताशी, आणि हे कायआक्रीत ? बाबांना अजिबात आवडलं नाहीये तुझं हे युरोप ट्रिप चं खूळ.  का जायचंय तुला?आत्ताच ते ही . कसं विचारणार आहेस आणि सासरच्यांना? तुझं  तूच परस्पर तिकीट सुद्धा काढलंस ?   "
"कुणालाही काहीही विचारायची गरज नाहीये. माझं जायचं ठरलंय  "
माधवीने तिकीट पर्स मध्ये ठेवलं .

...................................................................................................................................................................

अजूनसुद्धा माधवी खिडकीतून बाहेरच पाहत होती. लांब वरती पसरलेल्या विमानांच्या पंखांकडे..
घर्र  घर्र  इंजिनाचा आवाज करत बघता बघता flight नी आकाशात take-off सुद्धा केलं. खालच्या काळोखाला मागे टाकत.